KING JAMES BIBLEशोधा

Marathi Indian Revised Version Bible

इफि 1

सर्व · इफिशोधा

1इफिस शहरातील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे यांना, देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्त येशूचा प्रेषित, पौल याच्याकडून

2देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून तुम्हास कृपा व शांती असो. ईशस्तवन

3आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे.

4देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना जगाच्या रचनेपूर्वीच निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे.

5देवाच्या प्रीतीप्रमाणे, येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली.

6त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली.

7त्या प्रिय पुत्राच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे, देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.

8देवाची ही कृपा आम्हास सर्व ज्ञानाने आणि विवेकाने भरपूर पुरवण्यात आली आहे.

9देवाने गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे जी त्याने ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या इच्छेप्रमाणे प्रदर्शित केली.

10देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा काळाची पूर्णता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणील.

11देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो,

12ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहूदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली.

13ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.

14त्याच्या प्रियजनांची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा पुरावा आहे जेणेकरून देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी. देवज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना

15म्हणून तुमच्यामधील असलेला प्रभू येशूवरचा विश्वास व तुमची पवित्रजनांवरची प्रीती विषयी ऐकून

16मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबवले नाही.

17मी अशी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हास आपल्या ओळखीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;

18म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की, त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे,

19आणि आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय ते तुम्ही त्याच्या शक्तीशाली पराक्रमाच्या कामावरून ओळखून घ्यावे. ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाल्याने दिसून आलेले देवाचे सामर्थ्य

20त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले.

21त्याने त्यास सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे याकाळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच केले.

22देवाने सर्वकाही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्यास सर्वांवर मंडळीचे मस्तक म्हणून दिले.

23हेच ख्रिस्ताचे शरीर. जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ते भरलेले आहे.

Sources and attribution