Marathi Indian Revised Version Bible
स्तोत्र 1
1आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही.
2परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो.
3तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या, आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या, ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल.
4परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.
5म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत.
6कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल.