Marathi Indian Revised Version Bible
स्तोत्र 101
1मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन; हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन;
2मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. अहा, तू माझ्याकडे कधी येशील? मी माझ्या घरात सचोटीने चालेन.
3मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; अनाचाराचा मी द्वेष करतो; तो मला बिलगणार नाही.
4हेकेखोर लोक मला सोडतील; मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही.
5आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही.
6देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल.
7कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही.
8देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन.