Marathi Indian Revised Version Bible
स्तोत्र 26
1हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे. मी परमेश्वरावर न डगमगता विश्वास ठेवला आहे.
2हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर. माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा.
3कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे.
4कपटी लोकांबरोबर मी सहयोगी झालो नाही, किंवा मी अप्रामाणिक लोकांत मिसळलो नाही.
5मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. आणि मी दुष्टांसोबत राहत नाही.
6मी आपले हात निर्दोषतेने धुईन, आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन.
7अशासाठी की, मी तुझी स्तुती मोठ्याने करावी आणि तू केलेल्या आश्चर्याची कृत्ये सांगावी.
8परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते.
9पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस.
10त्यांच्या हातात कट आहे, आणि त्यांचा उजवा हात लाच घेण्याने भरला आहे.
11पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन, माझ्यावर दया कर आणि मला तार.
12माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे, सभेमध्ये मी परमेश्वराची स्तुती करीन.