KING JAMES BIBLEशोधा

Marathi Indian Revised Version Bible

प्रक 4

सर्व · प्रकशोधा

1ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दरवाजा माझ्यासमोर उघडलेला दिसला आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो म्हणाला, “इकडे वर ये आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.”

2त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्यासमोर राजासन होते कोणीएक त्यावर बसला होता.

3त्यावर जो बसला होता तो यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता आणि राजासनाभोवती पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते.

4राजासनाभोवती चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेले चोवीस वडील बसले होते.

5राजासनापासून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. राजासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते.

6तसेच राजासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते स्फटिकासारखे स्पष्ट होते. मध्यभागी व राजासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते मागून पुढून डोळ्यांनी पूर्ण भरलेले होते.

7पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा होता दुसरा बैलासारखा होता तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता, आणि चौथा उडत्या गरुडासारखा होता.

8त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते व त्यांना सगळीकडे डोळे होते, त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते, दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते. “‘पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभू देव सर्वसमर्थ,’ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे.”

9जो राजासनावर बसलेला आहे तो अनंतकाळपर्यंत जिवंत राहणार आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते चार जिवंत प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करीत होते,

10तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात

11“हे प्रभू, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस, तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले.”

Sources and attribution